… तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, नगरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

अहमदनगरमध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक घडामोडी घडल्याने या जागेवर कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे.

याठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिले आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी सुजय विखे म्हणाले की, मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिले आहे. यावर आता लंके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी याला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर सुजय विखेंनी निलेश लंके यांनी हे आव्हान दिले आहे.

महिनाभरात तरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असं सुजय विखेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुजय विखेंचे हे चॅलेन्ज निलेश लंके स्वीकारतात की नाही हे लवकरच समोर येईल. दरम्यान, विखेंच्या टीकेला आता रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत.

नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो, भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील, असेही ते म्हणाले.