प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या बापाची पोटच्या पोरीनेच दिली सुपारी; नंतर घडलं असं की…

आपल्या प्रेमासाठी काही लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. पण काही वेळा अशा घटना समोर येतात, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. अशीच एक घटना आता सोलापूरमधून समोर आली आहे. याठिकाणी प्रेमासाठी एका तरुणीने आपल्या वडिलांवरच हल्ला केला आहे.

सोलापूरातील माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीने आपल्याच वडिलांना अपंग करण्याचा प्लॅन रचला होता. त्यानुसार तिने वडिलांवर हल्लाही केला होता. वडील आपल्या मागे पळू नये यासाठी तिने असे केल्याचे समोर आले आहे. सध्या तिच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक केली आहे. मुलीचे नाव साक्षी शाह असे आहे. तिच्यासोबतच चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयुर चंदनशिवे, राम पवार, आनंद जाधव या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

साक्षीचे चैतन्य कांबळेवर प्रेम होते. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे होते. पण साक्षीच्या वडिलांचा याला विरोध होता. त्यामुळे चैतन्य आणि साक्षीने तिच्या वडिलांना अपंग करण्याचा निर्णय घेतला होता.

वडिलांना अपंग केले तर ते आपल्यामागे जास्त पळापळ करणार नाही. त्यामुळे आपल्याला पळून जाणे सोपे होईल, असा त्या दोघांचा प्लॅन होता. साक्षी आणि वडील हे दोघेही कारने घरी जाताना तरुण हल्ला करतील असे ठरले होते.

त्यानुसार वडील आणि साक्षी पुण्याहून कारने घरी जात होते. त्यावेळी बाथरुमला जायचे सांगून तिने गाडी थांबवली. ती थोडी लांब गेल्यानंतर चार तरुणांनी तिच्या वडिलांवर हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

साक्षीने पोलिसांना सांगताना चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे सांगितले. पण दोन तीन प्रश्न विचारल्यानंतर ती पोलिसांची दिशाभूल करु लागली. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने आपणच आपल्या प्रियकरासोबत मिळून हे सर्व केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.