Solapur news : सोलापूर जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आनंद प्रकाश मळाले (वय. ४७ वर्ष, रा.सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद मळाले हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळताच सोलापूर पोलीस दलात खळबळ उडाली होती. नांदेड पोलीस दलातील अधिकारी आनंद मळाले हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर होते. पत्नी, एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.
दरम्यान, आनंद यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला म्हणून माझ्या पतीने टोकाचं पाऊल उचलले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी पतीने भावनिक मेसेज पाठवला होता. चिमू, पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे.
पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. शनिवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी नैराश्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली.