जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.
आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी या हिंसाचारावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडे यांच्या संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. सध्या जालन्यात आंदोलन सुरूच आहे.
मराठा आंदोलनात उद्रेक करणारे हे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आहेत. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला, असा आरोप समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला.
दरम्यान, जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र सरकारकडून काही निर्णय झाला नाही.
उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण आणखी तीव्र केले आहे. आम्ही सरकारच म्हणणे ऐकत आहे, त्यांना वेळोवेळी चांगला प्रतिसादही देत आहे. परंतु आज जर त्यांनी कोणता निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
तसेच आज आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत केली होती.