आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावं यासाठी अनेक पालक प्रयत्न करत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही, असे म्हणत पालक आपल्या मुलामुलींना खाजगी शाळेत टाकताना दिसून येत असतात.
विद्यार्थी शाळा सोडून जात असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशी परिस्थिती असतानाच पुण्यातील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. शाळेत विद्यार्थी कमी झाल्यामुळे एका शिक्षकाने आपले जीवन संपवले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. जावजी बुवाजीवाडी येथील शाळेतील एका शिक्षकाने जीवन संपवले आहे. अरविंद देवकर असे त्या शिक्षकाचे नाव होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती.
शाळेची अवस्था बिघडलेली होती. पण विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी ती शाळा स्वच्छ केली. तसेच श्रमदान आणि इतर गोष्टींचं महत्वही अरविंद देवकर यांना या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यायचा होता. पण विद्यार्थ्यांच्या पालकांना ही गोष्ट पटली नाही.
विद्यार्थ्यांना शाळा स्वच्छ करायला लावली म्हणून पालक खुपच संतापले होते. त्यामुळे त्यांनी शाळेत येऊन खुप गोंधळ घातला. इतकंच नाही तर मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल केलं. १० विद्यार्थीच शाळेत होते, पण पालकांनी त्यांना दुसऱ्या शाळेत टाकलं. फक्त एकच विद्यार्थी तिथे होता.
पालकांच्या या कृतीमुळे अरविंद देवकर हे तणावामध्ये होते. काय करावे हे कळत नव्हते. त्यांना मुलांना काहीतरी चांगलं शिकवायचं होतं. पण पालकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेत मुलांना दुसऱ्या शाळेत टाकलं या कारणामुळे अरविंद हे खुप तणावात होते. अखेर त्यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. त्यामध्ये त्यांनी या सर्व गोष्टी लिहील्या होत्या.