राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेते हे पक्षांतर करत आहेत. असे असताना सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतीपदी शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे पराभूत झाले. यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत कोकाटे आणि वाजे घटाला समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या.
यामुळे सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावेळी कोकाटे गटाच्या संचालक सिंधुताई कोकाटे वाजे गटाबरोबर आल्याने वाजे गटाचे डॉ. रवींद्र पवार सभापती झाले होते. नंतर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणी डॉ. पवार अपात्र ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
यामुळे पुन्हा सभापतिपदासाठी निवडणूक झाली. यावेळी दोन्ही गटाने मोठी ताकद लावली होती. असे असताना शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे अपयशी ठरले.
यामध्ये कोकाटे यांचे विश्वासू बाजार समितीचे संचालक नवनाथ नेहे आणि शशिकांत गाडे या दोन संचालकांनी ऐनवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकाटे गट अल्पमतात गेला. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. काही वेळातच या घडामोडी घडल्या.
यामुळे कोकाटे गट सोडलेल्या शशिकांत गाडे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. अल्पमतात आल्याने कोकाटे गटाच्या सभापतिपदासाठी अर्ज भरलेले संजय खैरनार यांना माघार घ्यावी लागली. यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या पदासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून शशिकांत गाडे व कोकाटे गटाकडून संजय खैरनार यांनी अर्ज दाखल केले होते. वाजे व सांगळे गटाकडे अधिक सदस्य असल्याकारणाने खैरनार यांनी आपला दाखल केलेला अर्ज मागे घेतला. यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.