पुणे हादरलं! आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या ४ वर्षांच्या पोराला संपवलं; धक्कादायक कारण आले समोर

जेजुरी : जेजुरीत आईने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पोटच्या ४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. पुण्यातील या भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. प्रेमात अडथळा बनलेल्या मुलाची आईने प्रियकराच्या मदतीने हत्या केली.

मोडलिंब येथे राहणारी आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरलेल्या चुटक्या नावाच्या चार वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरसजवळील घाटात फेकून दिला होता.

ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाची उकल करत दोघांनाही ताब्यात घेतले आहे. चुटक्या शंकर पवार असे खून झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव असून त्याची आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके यांना जेजुरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी रेणू पवार यांच्या चुलत भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, पोलिस मित्र नानासाहेब घोगरे यांचा समावेश होता.

याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चुटका नावाच्या चार वर्षीय मुलाचा दीड महिन्यापूर्वी दोघांनी गळा आवळून खून केला होता.

हत्येनंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीवर नेऊन पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला होता. याप्रकरणी रेणू पवार यांच्या चुलत भावाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना अटक करून घाटात फेकलेल्या चिमुकलीचे अवशेष जप्त केले आहेत. दरम्यान, जेजुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे पुढील तपास करीत आहेत.