साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पुतण्यानेच आपल्या काकाची हत्या करून दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साक्री पोलिसांच्या तपासादरम्यान ही घटना उघडकीस आली. काका दारू पिऊन शिवीगाळ करत असल्यामुळे राग अनावर होऊन पुतण्याने मित्राच्या मदतीने ही हत्या केली.
काय आहे प्रकरण?
कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिरासमोरील पुलाजवळ सुमारे ३० ते ४० फुट खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या तोंडावर काळा रुमाल होता आणि हात-पाय दोरीने बांधलेले होते. ११ जानेवारी रोजी साक्री पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली. मृत व्यक्तीची ओळख सईद शहा चिराग शहा फकीर (वय २८) म्हणून पटली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवून मृताच्या पुतण्याला आणि त्याच्या मित्राला अटक केली.
काकाच्या दारूच्या सवयीमुळे पुतण्याचा राग
सईद शहा याला दारू पिण्याची सवय होती आणि तो कुटुंबीयांना शिवीगाळ करत असे. ही बाब त्याचा पुतण्या अवेश सलीम शहा (वय २४), व्यवसाय दुचाकी मॅकेनिक, याला सहन होत नव्हती. त्यामुळे अवेशने त्याचा मित्र सोहेल ऊर्फ बबलू मुबारक शहा (वय २०), व्यवसाय पंक्चर दुकान, याच्या मदतीने सईद शहा याची हत्या केली.
हत्येचा प्रकार
७ जानेवारी रोजी दुपारी सईद शहा दारू पिऊन अवेशच्या गॅरेजवर आला होता. रागाच्या भरात अवेशने त्याला त्याच्या मारुती स्विफ्ट कारमध्ये बसवले आणि सोहेलला सोबत घेत कोंडाईबारीकडे नेले. रस्त्यात दोघांनी सईद शहाच्या तोंडावर काळा रुमाल बांधला, त्याचे हात-पाय दोरीने बांधले, आणि जिवंत असतानाच त्याला पुलावरून दरीत फेकले. दोघेही नंतर घरी परतले.
पोलिसांनी आरोपींना अटक केली
दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.