५ वर्ष दोघे लिव्ह-इनमध्ये, मग प्रतिभाला संपवून फ्रिजमध्ये ठेवलं, १० महिन्यांनी भयानक घटना आली समोर

मध्य प्रदेशातील देवास शहरात एका बंद घरात फ्रिजमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरला अटक केली आहे. सध्या आरोपीच्या साथीदाराला पोलिस कोठडीत घेण्यासाठी तयारी सुरू आहे, जो दुसऱ्या गुन्ह्यात राजस्थानमधील तुरुंगात आहे.

देवासमधील वृंदावन धाम कॉलनीतील बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती भाडेकरू बलवीर सिंग यांनी पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, घरातील फ्रीजमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची 10 महिन्यांपूर्वी हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता.

त्यानंतर एफएसएल टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. बुधवारी रात्री बलवीरने या बंद घराचे कुलूप तोडून कुटुंबासह खोल्यांची साफसफाई केली होती. तेव्हा त्याने फ्रिज बंद केली. त्यानंतर या फ्रिजमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै २०२३ मध्ये संजय पाटीदार यांना हे घर भाड्याने दिले होते. संजयने जून २०२४ मध्ये घर सोडलं. परंतु, त्याने फ्रिजसह त्याचे काही सामान दोन खोल्यांमध्ये सोडलं होतं. तिथे महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यानच्या काळात संजय इथे ये-जा करत असे, पण तो घर पूर्णपणे रिकामे करत नव्हता आणि भाडंही देत नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा भाडेकरू संजय पाटीदार हा महिला प्रतिभासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. जानेवारी 2024 पासून प्रतिभाने संजयवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली.

परंतु, संजय विवाहित असल्यामुळे त्याने आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या केली. हत्येनंतर महिलेचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून त्याने घर सोडले. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.