पृथ्वीच्या भवितव्याबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात असतानाच, संशोधकांनी दक्षिण कोरिया या देशाच्या अस्तित्वावर गंभीर धोका व्यक्त केला आहे. लोकसंख्या घटण्याच्या वेगामुळे पुढील काही दशकांमध्ये हा देश संपूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण कोरियाला आर्थिक प्रगती आणि आधुनिकतेसाठी ओळखले जाते, परंतु झपाट्याने घटणारा प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्येच्या प्रमाणात होणारी वाढ ही समस्या चिंतेची बनली आहे. 1960 च्या दशकात लागू केलेल्या कुटुंब नियोजन धोरणांमुळे प्रजनन दरात घट होण्यास सुरुवात झाली.
त्यावेळी प्रति स्त्री 6 मुलांचा प्रजनन दर 1982 पर्यंत 2.4 वर आला. मात्र, नंतर हा दर सतत घसरत गेला. आज, दक्षिण कोरियाची लोकसंख्या सुमारे 51 दशलक्ष आहे, परंतु 2067 पर्यंत ती केवळ 25-30 दशलक्षांवर येण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये वृद्ध व्यक्तींचा देशातील लोकसंख्येत 14.9% वाटा होता, जो 2067 पर्यंत 46.5% होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2023 मध्ये प्रजनन दरात 8% घसरण झाली असून, हा दर कमी होत राहिल्यास 2100 पर्यंत देशातील लोकसंख्या निम्म्यावर येईल. या परिस्थितीला उपाययोजना करण्यात दिरंगाई झाली, तर दक्षिण कोरिया पृथ्वीवरून नष्ट होणारा पहिला देश ठरू शकतो, अशी भीती संशोधक व्यक्त करत आहेत.
दक्षिण कोरियाने तातडीने लोकसंख्या वाढवण्याचे धोरण स्वीकारले नाही, तर येत्या 75 वर्षांत देशातील 70% लोकसंख्या नष्ट होऊ शकते. ही परिस्थिती केवळ देशासाठीच नव्हे, तर जागतिक पातळीवरही चिंतेचा विषय ठरू शकते. देशाचे भविष्य वाचवण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि कुटुंबनियोजन धोरणांत तातडीने बदल आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.