पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता एक पोस्ट लिहिल्यानंतर ते पक्ष सोडणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.
पक्ष सोडल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना रडू आवरता आलं नाही. याबाबत ते म्हणाले, मनसेसाठी पुण्यामध्ये चांगलं वातावरण असतानाही मला लोकसभा निवडणूक लढवू दिली नाही, एकनिष्ठ राहिलो पण काही लोकांनी चुकीचे अहवाल दिले. मी वेळोवेळी राज साहेबांकडे याची तक्रार केली होती.
पण त्याची दखल घेतली गेली नाही. मी या आधी एकनिष्ठतेचा कळस केला, आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले असं सांगताना वसंत मोरे ढसाढसा रडले. मी रात्रभर झोपलो नाही, मला कुणी काहीच विचारलं नाही. आता राजीनामा दिल्यावर विचारत आहे.
मी निवडणूक लढवणे हा काय माझा गुन्हा आहे का, पक्ष वाढवण्यासाठी मागणी केली तर काय चुकलं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आता त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी पोस्ट त्यांनी कडून आपला राजीनामा दिला आहे.
वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये ते म्हणतात की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. दरम्यान, ते लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले वसंत मोरेंनी त्यांची तयारी सुरू केली आहे.
राज ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. कुठेही अन्याय होवो, त्या ठिकाणी जातीने हजर राहून न्याय मिळवून देणे, कोणतीही समस्या आपल्या स्टाईलने सोडवणे आणि धडाडीने काम करणे ही वसंत मोरे यांची ओळख होती.