उद्धवजी, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय! ‘मातोश्री’वर खणखणला फोन; ठाकरे म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीच्या आदल्या दिवशी, फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आणि शपथविधीला निमंत्रण दिले.

विरोधी पक्ष नेत्यांना शपथविधीला आमंत्रित करण्याच्या प्रथेचे पालन करत फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, तसेच उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. फडणवीस यांनी सांगितले की, शरद पवार यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे अनुपस्थित राहण्याचे कारण सांगून शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे यांनीही फोनवर अभिनंदन करत फडणवीसांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. विरोधकांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “विरोधक आले असते, तर मला अधिक आनंद झाला असता. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीलाही मी उपस्थित होतो. मात्र, राजकारणात कधी लोक येतात, कधी येत नाहीत. यावर मी अधिक भाष्य करणार नाही.”

फडणवीस पुढे म्हणाले, “मी विरोधकांना त्यांच्या संख्येवरून डिवचणार नाही. त्यांच्या समस्याही ऐकून घेईन. मागील पाच वर्षांत अनेक आव्हाने होती. २०१९ मध्ये जनादेश असूनही उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला, मात्र अडीच वर्षांच्या संघर्षात आम्ही एकत्र राहिलो.”

फडणवीस यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला विरोधकांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू असली, तरी त्यांनी सर्व पक्षांशी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे.