मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके हे प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या चित्रपटांचे नाव जरी ऐकले तरी चेहऱ्यावर हसू येत असतं. आज त्यांची ९१ वी जयंती आहे. त्यामुळे त्यांचे गाजलेले चित्रपट वाहिन्यांवर दाखवले जात आहे.
अशात झी टॉकीजवरही त्यांचे चित्रपट दाखवले जात आहे. पण झी वाहिनीच्या या निर्णयावर प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच उषा चव्हाण यांनी वाहिनीला याविरोधात कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.
उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ३१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले. त्यानंतर दादा कोंडके यांच्यासोबत मिळून त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली.
उषा चव्हाण यांनी दादा कोंडकेंसोबत १३ चित्रपटांची निर्मिती केली होती. आता त्या चित्रपटांवरुन झी टॉकीज आणि उषा चव्हाण यांच्यात वाद झाला आहे. चित्रपटाचे मालकी हक्क आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी हे चित्रपट दाखवण्यास मनाई केली आहे.
त्या चित्रपटांचा मालकी हक्क आपल्याकडे आहे. त्यामुळे ते चित्रपट दाखवले जाऊ नये, असे म्हणत त्यांनी याला विरोध केला आहे. तसेच कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्या परवानगी शिवाय हे चित्रपट विकता येणार नाही किंवा ट्रान्सफर करता येणार नाही, असे उषा चव्हाण यांनी म्हटले आहे.
उषा चव्हाण यांनी याप्रकरणी झी टॉकीज, एव्हरेस्ट एंटरटेंमेट यांना नोटीस पाठवली आहे. तर दादा कोंडके यांचे नातेवाईक माणिक मोरे आणि पद्माकर मोरे यांनाही हक्कभंगाबद्दल कळवले आहे. याप्रकरणी ११ जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.
१३ पैकी ५ चित्रपट या वाहिन्यांवर दाखवण्यात येणार होते. पण ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. उषा चव्हाण यांनी त्या चित्रपटांवर आक्षेप घेत वाहिन्यांना कायदेशीर नोटीशी पाठवल्या आहे. पण दादा कोंडके यांच्या नातेवाईकांनी या चित्रपटांबाबत वाहिन्यांशी करार केल्याचे म्हटले जात आहे.