बिग ब्रेकींग! SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई; वाल्मिक कराडच्या बायकोने उघड केले सुरेश धसांसोबतचे कनेक्शन

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली एसआयटी (विशेष तपास पथक) रद्द करून, ७ सदस्यांची नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेलि यांची या नव्या पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे.

मात्र, वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी या नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे. मंजिली कराड यांनी दावा केला आहे की बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून, त्यांची पत्नी शीतल तेली आयएएस अधिकारी आहे, जी आष्टीच्या आमदार सुरेश धस यांच्याशी जवळची आहे. त्यामुळे मंजिली कराड यांनी एसआयटीमधील सर्व आठही अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली आहे.

दोन मंत्र्यांना हटवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा बनवल्याचा आरोप

मंजिली कराड यांनी आपल्या पतीवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत आणि त्यांनी माध्यमांसमोर या प्रकरणात आपल्या पतीचा वापर बळीचा बकरा म्हणून केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, दोन मंत्र्यांना हटवण्यासाठी वाल्मिक कराड यांना यात गोवण्यात आले आहे. मंजिली कराड म्हणाल्या, “माझ्या पतीचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी काहीही संबंध नाही. या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जात आहे.”

बजरंग सोनवणे यांच्याकडून धमकी मिळाल्याचा दावा

मंजिली कराड यांनी दावा केला आहे की त्यांच्या पतीने बजरंग सोनवणे यांना निवडणूक जिंकण्यास मदत केली होती. तसेच, मंजिली कराड यांनी सांगितले की, जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड परळीत उपस्थित नव्हते.

सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) मागण्याची मागणी

मंजिली कराड यांनी सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे कॉल डेटा रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. त्यांनी असा दावा केला की, वंजारी समाज अल्पसंख्याक असल्यामुळे या समाजावर अन्याय केला जात आहे आणि त्यांच्या पतीवर खोटे आरोप लावून त्यांना फसवले जात आहे.

रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

मंजिली कराड यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांच्या पतीवर आणखी अन्याय झाला तर त्या समर्थकांसह रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांना राज्य सरकारवर विश्वास आहे, परंतु या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचे त्यांच्या मते दिसून येत आहे.

मंजिली कराड यांच्या या आरोपांमुळे प्रकरण आणखी गंभीर होत चालले आहे, आणि याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.