राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा, आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? जाणून घ्या…

सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. यामुळे आता उन्हाळा सुरूच झाला आहे. असे असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळीत मोठी गारपीट झाली. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज देखील गायब झाली होती.

यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जवळपास १५ ते २० मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडेल.