नाशिकमध्ये पंचाळे गावात एका कार्यक्रमात प्रवचन करताना सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. याबाबत वातावरण तापलं आहे.
मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी हे विधान होते. यानंतर मुस्लिम सामाज आक्रमक झाला आहे. त्यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर, नगर जिल्ह्यातही आंदोलन केले. शेकडो मुस्लिमांनी रस्त्यावर येत रास्तोरोको केला. यामुळे परिस्थिती तणावाची होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस देखील उपस्थित होते.
याबाबत रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तापले होते.
डीवायएसपी शिरीष वमने यांनी बंदोबस्त तैनात केला होता. अचानक मोठ्या प्रमाणावर लोकं रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. याबाबत शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले. असे असताना रामगिरी महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते म्हणाले, जे बोलायचे होतो ते बोललो आहे.
तसेच ते म्हणाले, सध्या धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत, त्यामुळे यावर काही बोलणार नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर पाहू. आमचा धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी आपल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी लागते, असेही ते म्हणाले.
हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावे, हा आमचा उद्देश आहे. असंघटितपणामुळे हिंदू समाजाचे नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले. यामुळे आता वातावरण शांत होणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण बिघडण्याच्या घटना समोर येत आहेत.