वडिलोपार्जित व्यवसायाने बदलले नशीब; आधी केलं १२०० रुपयांवर काम, आता आहे ११ हजार कोटींचे मालक

असे म्हणतात इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. खुप कमी लोक असे असतात जे स्वत:ला सिद्ध करुन दाखवत असतात. त्यातलेच एक म्हणजे हेमेंद्र कोठारी. हेमेंद्र कोठारी यांनी आपला वडिलोपार्जित १५० वर्ष जुना व्यवसायच पुढे नेला आहे.

हेमेंद्र कोठारी हे प्रसिद्ध गुंतवणूकदार आहे. त्यांच्या कंपनीची मालमत्ता १५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ते डीएसपी इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणे हाच त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.

बॉम्बे स्टॉक्स एक्सेचेंजच्या स्थापन केलेल्यांपैकी पुरभूदास कोठारी हे एक होते. हेमेंद्र कोठारी हे त्यांचे नातू आहेत. हेमेंद्र कोठारी यांचे वडीलही स्टॉक मार्केटमध्ये काम करायचे पण ना नफा ना तोटा असा ते व्यवसाय करायचे.

विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनी हेमेंद्र यांना शेअर मार्केटमध्ये करिअर करु नको असे सल्ला दिला होता. पण तरीही त्यांनी या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. हेमेंद्र कोठारी यांनी आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर या करिअरला सुरुवात केली.

त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कापड गिरीणीतून केली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पहिला पगार १२०० रुपये मिळाला होता. त्यांनी सुरुवातीला कापड गिरणीत सहाय्यक विक्री व्यवस्थापक म्हणून काम केले होते.

त्यानंतर हेमेंद्र कोठारी हे आपल्याच वडिलांच्या कंपनीत भागीदार बनले. १९६९ मध्ये त्यांनी या कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी डीएसपी कन्सल्टंट्सची स्थापना केली. २००८ मध्ये त्यांनी ब्लॅकरॉकसोबत भागीदारी केली. त्यांच्या या कंपनीने भारतातच नाही तर जगभरात नाव कमावले आहे.

हेमेंद्र कोठारी हे मुंबईतील अब्जाधीश व्यवसायिकांपैकी एक आहे. त्यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ११ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे. तसेच ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत २१४० क्रमांकावर येतात.