लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता. मात्र त्यांना हवं तेवढं यश मिळाले नाही.
यावेळी अनेक मंत्री पराभूत झाले. एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएचे ३०० उमेदवारही निवडून आले नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत. आता इंडिया आघाडी देखील यामध्ये यंत्रणा हलवत आहे.
सध्या तरी भाजपकडे २९२ उमेदवार आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. मात्र यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांनी आपली भूमिका बदलून जर इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ते सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. त्यांना विश्वासात घेतले आहे. दुसरीकडे, भारतीय आघाडी सावधपणे पावले उचलत असून सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असे म्हटले जात आहे. दिल्लीत सध्या बैठका सुरू आहेत.
इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार की नाही हे आज ठरेल अशी शक्यता आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. बुधवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना तसे संकेत दिले आहेत. शरद पवार दिल्लीत रवाना झाले आहेत.
दोन्हीकडून बैठका होणार आहेत. आता इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी कशा प्रकारे पावलं उचलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यात कसलीही अडचण नाही, मात्र मित्रपक्ष सरकार स्थापनेसाठी दबाव आणत आहेत.