कोरोना काळात थाळ्या का वाजवायला सांगितल्या? ४ वर्षांनंतर मोदींनी सांगितलं खरं कारण

देशभरात फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षेचा काळ असतो. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यासाठी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना अनेक टिप्स दिल्या.

हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे.

कोणत्याही प्रकारच्या दबावाला, ताण-तणावाला सामोरे जाण्यास तयार राहा, असे सांगताना मोदींनी कोरोना संकट काळाचा विशेष उल्लेख केला आहे. तसेच मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवू नका असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी कोरोना काळात मी देशवासीयांना थाळ्या वाजवायला सांगितल्या. यामुळे कोरोना संपत नाही, रुग्ण बरे होत नाहीत, याची मला कल्पना होती. पण यामुळे एक सामूहिक शक्ती निर्माण होते. थाळी वाजवल्याने, दिवे लावल्याने संकट काळात देश एक झाला. त्या संकटाला धैर्यानं सामोरा गेला, असेही मोदींनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशाने एकाचवेळी थाळ्या वाजवल्या. एकाचवेळी दिवे लावले. यातून देशवासीयांची एकता दिसली. करोना संकटात आपण एकटे नाही. पूर्ण देश एकत्रितपणे या संकटाचा सामना करत आहे. अशी भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सगळ्यांनी मिळून संघर्ष केला, तर आपण या संकटातून, अडचणीतून बाहेर पडू, असा विश्वास थाळी वाजवण्यातून निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. कोरोना संकट जागतिक महामारी होती. संपूर्ण जग त्यामुळे त्रासले होते.

या परिस्थितीतून मी काय करू शकतो, असे मी म्हणू शकलो असतो. पण मी असा विचार केला नाही. मी एकटा नाही. देशात १४० कोटी लोक आहेत. सगळ्यांनी सोबत राहून, एकत्र येऊन संकटाचा मुकाबला केल्यास आपण यातून बाहेर पडू असा विचार त्यावेळी मी केला.