लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती. कांद्यावर बोला असे हा तरुण सांगत होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली.
नंतर घोषणा देणारा तरूण शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला. या घोषणाबाजीनंतर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर टीका करत आहेत.
यानंतर खुद्द शरद पवार यांनीही या घोषणाबाजीचे समर्थन केले. त्यानंतर आता ज्या तरूणाने ही घोषणाबाजी केली, त्याने त्यामागची पार्श्वभूमी सांगितली आहे. या तरूणाचे नाव किरण सानप आहे. त्याने शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे.
याबाबत किरण सानप म्हणाला की, १५ मे रोजी मी पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य नागरिक म्हणून उपस्थित होतो. पंतप्रधानांचे भाषण मी काळजीपूर्वक ऐकत होतो. आमच्या प्रश्नांवर ते बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते हिंदू-मुस्लीम आणि धार्मिक मुद्द्यावर बोलत राहिले. १५-२० मिनिटांनी माझा धीर सुटला, त्यामुळे मी त्यांना कांद्यावर बोलण्याची विनंती केली, असे किरण सानप यांनी सांगितले.
कांदा हा एक महत्वाचा मुद्दा असून याबाबत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतले पाहिजे. तसेच तो म्हणाला, मी शरद पवार यांना माननारा कार्यकर्ता आहे. पण ही घोषणाबाजी करण्यासाठी कुणीही मला उद्युक्त केलेले नव्हते किंवा याबाबत मला कुणीही काही सांगितलेले नाही.
मी एक सामान्य शेतकरी आहे. त्या अनुषंगाने मी स्वयंप्रेरणेने मोदींना कांद्यावर बोलण्यासाठी आग्रह केला. असेही त्याने म्हटले आहे. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सभास्थळावरुन बाहेर नेले. यामुळे काहीवेळा सगळे त्याच्याकडे बघत होते.