शेतात ट्रॅक्टर चालू असताना राॅडमध्ये अडकला पदर, पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा तडफडून मृत्यू

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात फवारणी करत असताना अशी एक घटना घडली आहे की त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यावेळी तिचा पतीही समोरच होता.

डाळिंबाच्या झाडावर फवारणी करत असताना ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या रॉडमध्ये महिलेचा पदर अडकला होता. त्यामुळे मानेला तो बांधला गेला त्यामुळे पतीच्या डोळ्यासमोरच तिचा मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली आहे.

डोळ्यांदेखतच आपल्या पत्नीचा मृत्यू होत असल्यामुळे पतीही खुप आरडाओरड करत होता. पण साडी मानेला इतकी घट्ट बसली होती की तिला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. प्रियंका येलपेले असे त्या महिलेचे नाव होते.

१३ ऑगस्टच्या दुपारी प्रियांका आणि तिचा पती प्रवीण हे डाळिंब बागेत गेले होते. त्यावेळी ते ट्रॅक्टरच्या मदतीने बागेतील झाडांवर फवारणी करत होते. त्यावेळी प्रवीण येलपेले हे पुढे बघून ट्रॅक्टर चालवत होते. तर प्रियांका मागे जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने फवारणी करत होत्या.

अशात ब्लोअर रॉडला प्रियांका यांच्या साडीचा पदर अडकला. त्यामुळे तो पदर थेट प्रियांका यांच्या मानेला गुंडाळला गेला. तो इतका घट्ट गुंडाळला गेला की प्रियांका यांना श्वासही घेता येत नव्हता. त्यावेळी ट्रॅक्टर जाम चालू लागले म्हणून प्रवीण यांनी मागे वळून बघितले तर प्रियांकाच्या गळ्याला साडीचा पदर बांधला गेल्याचे दिसून आले.

त्यानंतर प्रवीण हे लगेचच खाली उतरले आणि मागे आले. त्यांनी प्रियंकाच्या गळ्याला बसलेला पदर काढला. त्यानंतर लगेचच रुग्णालयात प्रियांका यांना दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.