राज्यात लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना वर्धा लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री सुनील केदार हे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस हक्काचा वर्धा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार असल्याचे निश्चित मानले जात होते.
असे असताना समीकरण बदलले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शवला आहे. यामुळे आता काँग्रेसमधील माजी आमदार अमर काळे, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी दिल्ली जाऊन उमेदवारीसाठी जोर लावला आहे.
यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शरद पवार गटाला ही जागा सुटणार असल्याचे संकेत मिळताच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांनी नकार दिला. सुरुवातीला देशमुख यांनी वर्ध्यात बैठकांचे सत्र राबविले. संपर्क देखील वाढविला.
असे असताना मात्र त्यांच्या मते आपलेच आपल्याला साथ देणार नाही, असं लक्षात येताच शरद पवार यांची भेट घेऊन देशमुख यांनी माघार घेतली असल्याची माहिती आहे. या बदलातून शैलेश अग्रवाल आणि माजी आमदार अमर काळे ही नावे चर्चेत आली आहेत.
यामुळे त्यांनी फिल्डींग लावली आहे. दरम्यान, कराळे हे राष्ट्रवादीत आल्यास संपूर्ण राज्यात त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ होणार, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कराळे यांनी शरद पवार यांची अलीकडेच भेट घेऊन उमेदवारी मागितली. त्यांना होकार देतानाच स्वबळावर आणि स्वनिधीवर लढावे लागेल, अशी अट घातली. यामुळे त्यांच्या पुढे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.