बाजारात पैसा मिळेल पण…!! ठाकरेंच्या या शिवसैनिकाचे भाषण ऐकून उपस्थित गहिवरले, नेमकं काय घडलं

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचे भर पावसात निष्ठेची आठवण करून देणारे एक भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्हाला खोके मिळत असताना आम्ही त्या बोक्यांसोबत गेलो नाही, त्याचप्रमाणे राजेश टोपे देखील शरद पवार साहेबांसोबत इमानदार राहिले, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे यांची संकटात साथ सोडली नाही. तुम्ही देखील आयुष्यात कॉम्प्रमाईज करू नका, सत्याची साथ सोडू नका, बेईमानी केल्याने पैसा येईल पण माणसाची बाजारातली पत जाते. यामुळे नंतर कोणी विचारत नाही असेही ते म्हणाले.

पत निष्ठेने कमवावी लागते. आम्ही जागेवर आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे.असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय जाधव यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी परभणी लोकसभा मतदारसंघातील तीर्थपूर तालुका घनसांगवी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेदरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला, पण सभास्थळावरून ना नेते हटले, ना मतदार. भर पावसामध्ये संजय जाधव आणि राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले. यामुळे या सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच याचे व्हिडिओ आणि भाषण देखील व्हायरल झाले आहेत.

यावेळी संजय जाधव म्हणाले की 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये धनुष्यबाणावर शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. पण या वेळेस आमचा धनुष्यबाण हिरावून घेतला. यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल.

आमचा शिवसेना पक्ष हिरावून घेतला. त्याचबरोबर माझ्यासोबत बसलेले राजेश टोपे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे दोन्हीही हिसकावून घेतलेले आहेत. यामुळे याचा बदला घेण्याची वेळ सध्या आली आहे. येथील मतदारांनी या गद्दारांना चांगलाच धडा शिकवावा ,असेही संजय जाधव म्हणाले.