ब्रिजभुषणने कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले, जबरदस्ती केली; पोलिसांनी दिला ‘हा’ महत्वाचा पुरावा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर ठेवण्यात आले आहेत. एक फोटो देखील आहे ज्यामध्ये ब्रिजभूषण एका महिला कुस्तीपटूच्या अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे.

प्रत्येकजण फोटोसाठी पोज देत आहे पण सिंग कुस्तीपटूचा हात धरून हसताना दिसत आहे. त्याच्या हावभावाचे आणि शारीरिक वृत्तीचे पोलिसांनी अतिशय खोलवर विश्लेषण केले आहे. सार्वजनिक ठिकाणी काढलेल्या या फोटोमध्ये इतरही अनेक लोक उभे असल्याचे दिसत आहे.

सूत्रांनी सांगितले की, हा फोटो सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला आहे. ह्या आणि अशा अनेक छायाचित्रांच्या आधारे दिल्ली पोलिसांनी सिंग यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग यासारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि शिक्षा होऊ शकते.

आरोपपत्रानुसार, फोटोमध्ये दिसणार्‍या महिला कुस्तीपटूने दावा केला आहे की ब्रिजभूषण शरण सिंहने सहा वेळा तिचा विनयभंग केला. कुस्तीपटूने असा दावाही केला आहे की तिने ब्रिजभूषणसिंगच्या वृत्तीवर आणि खूप जवळ येण्यावर आक्षेप घेतला.

आरोपपत्रात म्हटले आहे की, सहा कुस्तीपटूंच्या तक्रारींवरून आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, विनयभंगाच्या आरोपांनुसार कारवाई आणि शिक्षा होऊ शकते.

साक्षीदारांच्या यादीतील दोन पैलवानांनी या आरोपांना दुजोरा दिला आहे. डब्ल्यूएफआयच्या माजी अध्यक्षांची चुकीची बॉडी लँग्वेज मी स्वत: पाहिल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. सिंग यांच्याविरोधात २१ साक्षीदारांनी जबाब नोंदवले आहेत.

सहा जणांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला आहे. सहा साक्षीदार कुस्तीपटू, पाच बळींचे नातेवाईक, चार सहकारी पैलवान, दोन प्रशिक्षक, दोन पंच आहेत. सिंग यांच्या व्यतिरिक्त पोलिसांनी त्यांच्या सहाय्यकाविरुद्ध आरोपपत्र तयार केले असून डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित केले आहे.