दहावीचा पेपर आणि वडिलांचे अचानक दुःखद निधन, मुलगा दुःखात अन् बोर्डाने घेतला ‘तो’ निर्णय…

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची माहिती ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.

या घटनेमुळे तो परीक्षा कुठे देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र दुसऱ्या तालुक्यात होते. मात्र बोर्ड, शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय केली होती. यामुळे त्याची सोय जवळ झाली. ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी-सलगरा बु. येथे मामाकडे शिक्षणासाठी राहतो. दहावी परीक्षेसाठी बोरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात त्याचा बैठक क्रमांक आला होता.

असे असताना एक दुःखद घटना घडली. त्याचे वडील रामनाथ पुरी यांचे काम करताना अपघाती निधन झाले. ही वार्ता समजताच ऋषिकेशला ढाळेगावला जावे लागले. एकीकडे दहावीची महत्वाची परीक्षा आणि एका बाजूला वडिलांच्या जाण्याचे दुःख, यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.

परीक्षा केंद्र मूळगावापासून १०० किलोमीटरवर असल्याने पेपर देता येणार नाही असाच समज होता. त्यात वडिलांच्या निधनामुळे ऋषिकेशही पेपर देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता. यामुळे त्याचा पेपर बुडणार असाच समज सर्वांचा झाला होता.

असे असताना येथील नातेवाइकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी ऋषिकेशच्या घरी याबाबत सोय करण्याचे आश्वासन दिले. त्यास सर्व प्रकारची परवानगी मिळवून देत गावातीलच परीक्षा केंद्रावर त्याची परीक्षा देण्याची सोय केली.

ऋषिकेश परीक्षा देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मात्र, लातूर विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली, सांत्वन केले. परीक्षा देण्यास त्याला तयार केले. सर्व प्रकारची परवानगी देत ढाळेगावातील माध्यमिक आश्रमशाळा या केंद्रावर परीक्षेची सोय केली. यामुळे मोठा प्रश्न मार्गी लागला.

दरम्यान, त्याच्या चेहेऱ्यावर मोठे दुःख होते. परीक्षेला जाताना वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि तो परीक्षेला निघाला. यावेळी नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यामुळे ही घटना किती दुःखद होती. मात्र अखेर त्याने पेपर दिला.