‘…पण पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही’; स्टेटस ठेऊन तरुणाने वाहत्या नदीत घेतली उडी

प्रेमप्रकरणातून अनेकदा धक्कादायक घटना घडत असतात. काहीवेळा तर लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना मांगले येथून समोर आली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून जीवन संपवले आहे.

मांगले येथील मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरुन एका तरुणाने पाण्यात उडी घेतली आहे. जीवन संपवण्याआधी त्याने स्टेटस ठेवला होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने पाण्यात उडी घेतली होती.

तुषार पांढरबळे असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे वय फक्त २४ वर्षे होते. बिळाशी हे त्याचे मूळ गाव होते. बंधाऱ्यावरुन तो मोबाईलवर बोलत होता. त्यानंतर त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील काही मच्छीमारांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने त्यांचे ऐकले नाही आणि थेट पाण्यात उडी घेतली.

उडी मारण्यापूर्वी तुषारने मोबाईलवर एक स्टेटस ठेवले होते. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका. मी कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहीन. पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असे स्टेटस त्याने उडी मारण्यापूर्वी ठेवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तो मामाकडे राहत होता. काही वर्षांपूर्वीच तो आईला घेऊन मामाकडे आला होता. इथे तो खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. अशात शनिवारी दुपारी तो बंधाऱ्याकडे गेला होता. त्यानंतर फोनवर बोलता बोलताच त्याने असा टोकाचा निर्णय घेतला आहे.

मी उडी घेतोय, असे तो फोनवर बोलत होता. त्यावेळी मच्छीमार लोकांनी ते ऐकलं. त्यामुळे त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो त्याने उडी घेतली. जोरदार पावसामुळे वारणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. प्रवाह जास्त असल्यामुळे त्याने उडी मारताच तो दिसेनासा झाला.

दरम्यान, पोलिस तुषारचा शोध घेत आहे. नदीपात्र मोठं असल्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे तो वाहत कुठे गेला असावा हे सांगणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक त्याला शोधत आहे.