भयानक! भोपळ्याची भाजी खाणं कुटुंबाला पडलं महागात, तीन चिमुकल्यांनी गमावला जीव

१५ ऑगस्टच्या दिवशी संपुर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हरियाणामध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबाला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. चंदीगढच्या बालंदमध्ये ही घटना घडली आहे.

रात्री भोपळ्याची भाजी खाल्ल्यामुळे संपुर्ण कुटुंबाची प्रकृती खुपच बघिडली होती. त्यानंतर त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

१५ ऑगस्ट रोजी रात्री बालंद येथील एकाच कुटुंबातील ९ जण आजारी पडले. रात्री ते भोपळ्याची भाजी खाऊन झोपी गेले होते. पण मध्यरात्री सर्वांना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे संपुर्ण कुटुंब उपचारासाठी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनीही त्यांना औषध देऊन घरी पाठवले.

घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यामुळे जवळच्या एका रुग्णालयामध्ये ते दाखल झाले. सध्या इतरांवर उपचार सुरु आहे. पण त्यामध्ये तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दिव्या (७), इयांशू (२) आणि लक्षिता (८) असे त्या मुलांची नावे आहेत.

तसेच गणिका (१०) ची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहे. सध्या कुटुंबातील सदस्य राकेश आणि त्यांची पत्नी मोनिका, राजेश आणि त्यांची पत्नी सीमा आणि राजेशचा मोठा मुलगा जतीन यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहे.

राजेश आणि राकेश हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. ते दोघेही एकाच घरामध्ये राहतात. त्यांच्यासोबत ही घटना घडल्यानंतर कुटुंबातील ६५ वर्षीय एका सदस्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन याबाबत माहिती घेतली आहे. पोलिस याचा तपासही करत आहे.

६५ वर्षीय कृष्णा यांनी सांगितले की, १५ ऑगस्टच्या रात्री भोपळ्याची भाजी खाऊन सर्वजण झोपी गेले होते. नंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार त्यांनी अन्नाचे नमुनेही घेतले असून तपास केल्यानंतर ते याप्रकरणी कारवाई करणार आहे.