सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी असलेला हा चित्रपट थेटरमध्ये जोरदार धुमाकूळ घालतो आहे. दिग्दर्शक अनेकदा असे बोलत असतात की मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटच आवडत नाही. पण या गोष्टी आता चुकीच्या ठरताना दिसून येत आहे.
कोरोनानंतर झिम्मा हा मराठी चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर चंद्रमुखी, वेड अशा मराठी सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर खुप चांगली कामगिरी केली आहे.
आता नुकताच बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
असे म्हणतात हिरो नसला तर चित्रपट चालत नाही. पण या हिरो नसलेल्या चित्रपटाने परदेशातही कमाल केली आहे. हा चित्रपट महिला वर्गासाठी बनवण्यात आलेला असला तरी प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा पाहत आहे.
काही महिलांनी तर तो चित्रपट पाहण्यासाठी चक्क एक बस बुक केली होती. त्या स्पेशल बसने हा चित्रपट पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यांनी दापोली ते खेड असा ४५ किलोमीटरचा प्रवास फक्त हा चित्रपट पाहण्यासाठी केला आहे. त्या महिलांनी गॉगल घालून फोटो शुटही केले आहे. सध्या या महिलांची सर्वत्र चर्चा होत आहे.
बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. ३० जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट कोट्यवधी रुपये कमवत आहे. गेल्या शनिवारी ५.२८ कोटी तर रविवारी ६.१० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.