६३ वर्षीय डॉक्टरचे भयानक कृत्य, १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करत केले गर्भवती; नागपूर हादरलं

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे.

नागपूरच्या रामटेकमध्ये एका ६३ वर्षीय डॉक्टरने एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुलीने बाळालाही जन्म दिला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुटलेल्या हाडांवर औषध लावण्याच्या बहाण्याने एका ६३ वर्षीय डॉक्टरने एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले होते. पोलिसांनी आता त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच तपास करुन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मनोहर काठोके असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते रामटेक येथील महादुला येथील रहिवासी आहेत. ते जंगलातून झाडे आणून रुग्णांच्या तुटलेल्या हाडांवर लावून आणि प्लास्टर करुन पैसे कमवतात. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे येत असतात.

संबंधित मुलगी ही कपडे वाळवायला गेलेली असता ती पडली होती. त्यामुळे तिचे दोन्ही हात फ्रॅक्टर झाले होते. त्यामुळे तिच्यावर एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पण फरक पडत नसल्यामुळे मुलीच्या पालकांनी त्या मुलीला उपचारासाठी मनोहर काठोके यांच्याकडे आणले.

मनोहर काठोके हे रोज सकाळी १० वाजता त्या मुलीच्या घरी जायचे आणि पेस्ट लावून दुपारी २ वाजता घरी परतायचे. तिला आराम मिळत असल्यामुळे तिच्यावर हे उपचार सुरुच होते. तिचे पुर्ण शरीर झाडांच्या पानांनी झाकलेले होते.

अशात त्याची वाईट नजर तिच्यावर पडली. जानेवारी २०२२ मध्ये डॉक्टर एकेदिवशी तिच्या घरी आला होता. त्यावेळी आईवडिल हे शेतात गेले होते. त्यावेळी दोन्ही हाताला प्लास्टर बांधून ते बेडला बांधून तिच्यावर अत्याचार केले. तसेच हे कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. ९ ऑगस्ट २०२२ ला तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीने सांगितले की डॉक्टर दीडवर्षांपासून अत्याचार करत होता.

खुप उशीर झाला असल्यामुळे मुलीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या पालकांनी रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्यांनी त्या डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.