वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिच्या निवडीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वेळी ती वादग्रस्त ठरत आहे. तिची निवड कशी झाली तिने अपंगत्व प्रमाणपत्र कसे दिले, शाररिक चाचणी कशी हुकवली, याबाबत आता माहिती समोर आली आहे. असे असताना तिची आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मनेरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्या गावातील काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्यांनी अनेक सुरक्षा रक्षक सोबत घेत शेतकऱ्यांना दमदाटी केली आहे. काल मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर आरेरावी केल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
दरम्यान, या व्हिडीओमधील महिला IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत आहेत. त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत.
जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला आहे. यावेळी काही शेतकरी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत’, असे सांगताना ऐकू येत आहेत.
पण त्याचवेळी ‘मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे’, असे त्या गावकऱ्यांना सांगत आहेत. धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. यामुळे गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद झाला.
दरम्यान, या वादावेळी त्या गावात बाऊन्सर घेऊन गेल्या व त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही तक्रार मात्र नोंदवली गेली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.