सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटक हे धबधबे तसेच डोंगर नद्या अशा ठिकाणी जात आहेत. यावेळी मात्र अनेक दुर्घटना घडत आहेत. आता धबधब्याचा आनंद लुटताना रील काढ ण्याचा झालेला मोह मुंबईतील २७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतला आहे. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.
आता theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून प्रवास आणि जीवन शैली विषयक ट्रॅव्हलॉग शेअर करणाऱ्या तरुणीचा करुण अंत झाला. ३५० फूट उंचावरुन खोल दरीत पडल्यामुळे आनवी कामदार हिला प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे पावसाळी पर्यटनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आनवीच्या मृत्यूमुळे तिच्यासह ट्रेकिंगला गेलेल्या तिच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेने कामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईत राहणाऱ्या आनवीने डेलॉईटसारख्या बड्या कंपनीसोबत काम केलं होतं. तिच्या अशा जाण्याने धबधब्यावर जाताना किती काळजी घ्यावी याबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, तिचे दोन लाख ६० हजारांहून अधिक इन्स्टा फॉलोअर्स आहेत. तिने २८०० पोस्ट आणि रील्समधून प्रेक्षकांसाठी देश-विदेशातील पर्यटनाचं एक दालनच खुले केले होते. ती आपल्याला अनेक प्रकारची माहिती देत होती. १६ जुलै रोजी रील शूट करताना दरीत पडून आनवीचा मृत्यू झाला. मित्रमैत्रिणींसह ती पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी रायगड येथील कुंभे धबधब्यावर गेली होती.
ती एका सुळक्यावर रील व्हिडिओ शूट करत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट ३५० फूट खोल दरीत कोसळली. त्याच्या केवळ एक दिवस आधी म्हणजे १५ तारखेलाच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी पाच पर्यटन स्थळांची माहिती तिने त्यात दिली होती.
ती जेव्हा सापडली तेव्हा तिचा श्वास सुरू होता. तिने माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. आनवीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे फिरण्यासाठी बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.