राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला. विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची अनेक मतं फुटली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहेत. यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर कारवाई करणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे मात्र शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव शरद पवार यांच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती.
जयंत पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला होता. दरम्यान, काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळेच जयंत पाटील यांचा पराभ झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे या आमदारांवर आता कारवाई होणार आहे. आता काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिले आहेत. यामुळे हे आमदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे याबाबत नावे लवकरच समोर येणार आहेत.
आता कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून नेमकी काय कारवाई केली जाणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र यामुळे अनेक आमदारांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, हे फुटलेले आमदार आधीपासूनच काँग्रेस पासून लांब गेले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत संजय राऊत यांनी देखील माहिती दिली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात पक्ष त्यांना सोबत ठेवणार की मोठी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.