ऑनलाईन गेमची टास्क पुर्ण करण्यासाठी शाळकरी मुलाने १४ व्या मजल्यावरून घेतली उडी; पुण्यातील भयंकर घटना

सध्या मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामधून अनेकदा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पबजी गेममुळे अनेकांचे जीव देखील गेले. आता या ऑनलाईन गेममुळे अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमच्या नादात एका १५ वर्षाच्या मुलाने चौदा मंजल्याच्या इमारतीवरून उडी मारली. शहरातील किवळे परिवारातील रुणाल गेटवे सोसायटीत ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने सगळेच हादरले आहेत. आर्य श्रीराव (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

हा तरुण चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. असे असताना मागील सहा महिन्यापासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. ब्लू व्हेल सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाला होता. तो या गेमवरून सतत चीड चीड करत होता.

तो तासनतास स्वतःला आपल्या घरातील खोलीत बंद ठेवून ब्ल्यू व्हेल सारखा ऑनलाईन गेम खेळत होता. कधी- कधी तर तो दोन-तीन दिवस स्वतःला खोलीत बंद ठेवत असायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी होती, तो दिवस आर्यने गेम खेळण्यामध्येच घालवला.

रात्री तो जेवायला देखील बाहेर येत नव्हता. घरच्यांनी अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर आला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीत जाऊन बसला. रात्री सोसायटीच्या व्हॉटसअपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली.

मुलगा देखील घरात नव्हता. यामुळे आई घाबरली. त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, तो त्यांचाच मुलगा होता. रक्ताच्या थारोळ्यात पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचे निधन झाले होते.

दरम्यान, घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळले. मात्र यातून त्याला काय नमूद करायचे होते, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत. या घटनेने मात्र शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.