सध्या नागपंचमीचा सण साजरा केला जात असून यावेळी पतंग उडवली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. असे असताना बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी चायनीज मांज्यामुळे एकाचा गळा कापल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या मांज्यावर बंदी असताना देखील मांजा उडवण्याचा प्रमाण काही कमी होत नाही. यामुळे कारवाईची मागणी होत आहे.गेल्यावर्षी पोलीसांनी यावर मोठी कारवाई केल्याचे दाखवले. मात्र यावर्षी पुन्हा मांजा वापरला जात असल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे क्षणाचा आनंद जीवघेणा ठरत आहे.
याबाबत माहिती अशी की, आज बारामतीत एका बांधकाम व्यवसायकाचा गळाच या मांजाने कापला गेला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला आहे.
अनिल मोहन कायगुडे हे बारामती शहरातील बांधकाम व्यवसायिक आहेत. आज ते मएसो शाळेपासून एमआयडीसीतील त्यांच्या घरी निघाले होते, यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेजवळ रस्त्याच्या आडवा अडकलेला मांजा त्यांना दिसलाच नाही, यामध्ये मांजा गळ्याला लागून त्यांचा गळा कापला आहे.
दुचाकीवरील कायगुडे यांच्या गळ्याला मांजा चिरला. याने कायगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लगेच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. यामुळे पुन्हा एकदा मांजा खरोखरच शहरातून हद्दपार झाला आहे का? याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, दुकानदारांवर जुजबी कारवाई करण्यात आल्याने काही होणार नाही. या दुकानदारांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. ज्या दुकानदारांना व्यवसायात विकत असलेली वस्तू विषारी आहे याचे काहीच देणे घेणे नाही, यामुळे सगळेच हा मांजा विकतात.
शहर पोलीस यांच्याकडून कारवाई कठोर होत नसल्यानेच अशा दुकानदारांचे फावत असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. असा मांजा जर कुठे व्यावसायिकाकडे आढळला, तर कायद्यातील कलमांच्या तरतुदीचा योग्य तो वापर करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.