ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये विमान कोसळण्याचा दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नेपाळमध्ये विमान अपघाताची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मोठा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत.
साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानात ६२ जण होते. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्ये विमानात असलेले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. तसेच विमान कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबतची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांना दिली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचे मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. या विमान अपघाताचे अजून कारण समोर आले नाही. साओ पाऊलोच्या विन्हेडो शहरात एक विमान कोसळले.
या विमानात ५८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. अपघातात ते सगळे मृत्यूमुखी पडले आहेत. विमान अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
या अपघातात विमान एखाद्या कागदाच्या पानासारखं हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच सगळीकडे काळा धूर पसरताना दिसतो. विमान जमीनदोस्त होताच त्याला आग लागली. यामध्ये काही जखमी असलेल्या लोकांचा देखील जीव गेला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
हे विमान नागरी वस्तीवर कोसळले. हे विमान कोसळताच त्याने पेट घेतला. हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होते. पराना राज्यातील कास्कावेलमधून ते साओ पाऊलोतील गुआरुल्होसला जात होतं. विभागाची सात पथकं घटनास्थळी आहेत. या घटनेवर जगभरातून दुःख व्यक्त केलं जातं आहे.