गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेक लोकांना या भीषण अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. आता अशीच एक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे.
बुलढाण्यातील मलकापूर शहरात दोन खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० प्रवासी हे जखमी झाले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
काहीजण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हा अपघात मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर झाला आहे. पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बस अमरनाथवरुन तीर्थ यात्रा करुन येत होती. ती हिंगोलीच्या दिशेने जात होती. त्यामध्ये ४० भाविक होते. तर दुसरी बस नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने रवाना होत होती. मलकापूर उड्डाणपूलावर दोन्ही बस समोरासमोर आल्या.
मलकापूर शहरातील उड्डाणपूलावर या दोन्ही बस एकमेकांना जोरात धडकल्या. त्यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या ३० प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले होते. त्यांनी लगेचच जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पण त्यापैकी काही प्रवासी हे गंभीर जखमी असून मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं आहे.