भेकड अन् भित्र्या, नालायक, लाज अन् माज; अंधारेंनी शेलक्या शब्दांत पोंक्षेंना झापलं, वाचा नेमकं काय म्हणाल्या..

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली होती. त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे ही पायलट झाल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी पोस्ट केली होती. पण त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असे काही म्हटले आहे, ज्यामुळे ते वादात सापडले आहे.

कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? असे शरद पोंक्षे यांनी म्हटले होते.

मुलीला शुभेच्छा दिल्या असल्या तरी शरद पोंक्षेंनी यामध्ये आरक्षण आणि सवलतीवर भाष्य केलं होतं. त्यामुळे अनेकांना ती गोष्ट आवडली नसून त्यांच्यावर लोक टीका करत आहे. या वादात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे.

सुषमा अंधारे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी जातीय आरक्षणावर भाष्य करत शरद पोंक्षेंना चांगलंच सुनावलं आहे. सुषमा अंधारे यांची ही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सुषमा अंधारेंची पोस्ट-
शरद राव (पोंक्षे ) नमस्कार, एरवी मला दादा भाऊ असं बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही. कारण तुमची माझी ना जात एक आहे.. ना गोत्र एक आहे.

कारण माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही.

तुमच्या लेकीचं मनःपूर्वक अभिनंदन. लेक कुणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे. पण शरदराव कौतुक करताना सुध्दा माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का ? शरदराव, “भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. हे माहीत असेलच तुम्हाला.

उलट ज्याच्यामध्ये कमालीचं बाहुबल आहे, भल्या भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा.”

हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे आज माझ्या राजकीय कारकीर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठलं जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलंच आहे.

अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किंवा वांशिक निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेषष्ट्यांना अजिबात कळणार नाही.

आणि हो या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहलत ना, त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज असताना सुद्धा माझं संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे. आणि हो नुसतं पूर्ण केलं नाही तर विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केले आहे.

त्यामुळे आरक्षण लाभार्थी होणे शक्य असतानाही ते नाकारण्याची हिंमत जर मी करू शकत असेल तर तुमच्यासारख्या माणसाला (?) आरसा दाखवण्याची हिंमत मी करूच शकते. नाही म्हणजे माझं कौतुक तुमच्या पेक्षा दुप्पट नाही का ?

अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे यासाठी कुठेही अर्ज केलेला नसतो हे माहीत असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचं भान असेलच तुम्हाला.

शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारा दरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ, केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहीत होत्या का हो….

असो बोलण्यासारखे बरेच आहे.. पण तूर्तास एवढेच.. ! लवकर बरे व्हा..!! ता. क. जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध गुरुनानक महावीर कबीर संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला खात्रीने पित्त असे उफाळून येणार नाही. – प्रा. सुषमा अंधारे