आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून संगमनेर शहरात राहणाऱ्या पती-पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात राहत असलेल्या गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या का केली याबाबत तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या आत्महत्येने संगमनेर शहर हादरलं आणि परिसरावर शोककळा पसरली. त्यांची ही आत्महत्या कौटुंबिक नैराश्यातून झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अवघ्या आठ दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणेश वाडेकर हे संगमनेरच्या नगरपालिकेतील कर्मचारी होते तर गौरी वाडेकर देखील आरोग्य खात्यात कर्मचारी होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलाने घरातच आत्महत्या केली होती. त्यातून कसेबसे हे कुटुंब सावरले होते, पण आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने थांबलेल्या २१ वर्षीय मुलाने देखील आत्महत्या केल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
या पती-पत्नीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. यामध्ये वाडेकरांच्या मुलाने पुण्यामध्ये जी आत्महत्या केली. त्या संदर्भात वाकड पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल नाराजीचा मजकूर असल्याची चर्चा शहरात आहे.
दरम्यान, गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत कार्यरत होते, ते सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. या घटनेमुळे सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत चौकशी सुरू आहे.