भोपाळमध्ये चोरीची एक वेगळीच घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी राज्य संग्रहालयात एका मोठ्या चोरीचा उलगडा झाला आहे. चोराने संग्रहालयातून १५ कोटींचे सोने आणि चांदीची नाणी चोरली होती. यानंतर पळून जात असताना २५ फूट उंच भिंतीवरूनही त्याने खाली उडी घेतली.
यावेळी मात्र उडी मारताच त्याचा पायाचं हाड आणि पाठीचा कणा मोडला, यामुळे हा चोर जखमी झाला. त्याला पळून जाता आले नाही. तो तिथेच बेशुद्धावस्थेत आढळून आला, त्याला पकडल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. हा चोर बिहारचा रहिवासी असल्याची माहिती आसून विनोद यादव असे त्याचे नाव आहे.
पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. हा चोर गेल्या काही महिन्यांपासून या चोरीचा प्लॅन करत होता. त्याने या संग्रहालयाची माहिती घेतली होती. त्याने धूम हा चित्रपट पाहिला होता. धूम हा चित्रपट पाहिल्यानंतरच त्याला या चोरीची आयडिया आली होती. मात्र तो यशस्वी झाला नाही.
तो राज्य संग्रहालयाला भेट देत राहिला. त्याठिकाणी रेकी केली. सहा महिन्यात त्याने संग्रहालयाच्या सुरक्षेचे निरीक्षण केले, यानंतर त्याने चोरी केली. येथील गार्डची नजर चुकवून त्याने पिशवीत हातोडा, स्क्रू ड्रायव्हर आणि इतर वस्तू आत नेल्या. तसेच तो संग्रहालयातच लपून बसला. संग्रहालय बंद झाल्यानंतर त्याने ही चोरी केली.
याबाबत भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायण जरी मिश्रा यांनी माहिती दिली. आरोपी २० रुपयांचे तिकीट घेऊन संग्रहालयात आला होता. दरम्यान, त्याने यशस्वी चोरी केल्यानंतर सर्व सामानासह संग्रहालयाच्या भिंतीवरुन उडी मारली. मात्र यावेळी त्याला अंदाज न आल्याने तो जखमी झाला.
खाली पडल्यानंतर त्याचे हाड मोडले, त्यामुळे त्याला पळता आले नाही. दुसऱ्या दिवशी संग्रहालयाचे उघडले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तो भिंतीजवळ सामानासह पडलेला आढळून आला. अधिकचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.