ताज्या बातम्या

“दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राच्या अण्णासाहेब मोरेंना सहआरोपी करा”, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण

दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राच्या अण्णासाहेब मोरेंवर बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी वाल्मीक कराड याला पाठीशी घालण्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून, त्यांनी अण्णासाहेब मोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कराड फरार असतानाही त्याने दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात भेट दिल्याची माहिती समोर आल्यावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणामुळे आता नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. “बीडमध्ये असलेले एका मोठ्या शक्तीचे गुरुमाऊली हेच स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आहेत,” असा दावा वाघ यांनी केला. त्यांनी मोरे यांना देशमुख हत्येप्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, वाल्मीक कराड दोन दिवस नाशिकमध्ये राहिला होता आणि त्यांच्या केंद्रात हजेरी लावली होती. “दत्तजयंतीच्या गर्दीमुळे मोरे यांना कराड आला असल्याचे कळले नाही, हे हास्यास्पद आहे. दर्शनासाठी दोन दिवस लागत नाहीत, आणि गुन्हेगाराला मदत करणे निषेधार्ह आहे,” असा आरोप वाघ यांनी केला.

प्रफुल्ल वाघ यांनी २०२३ मधील खंडणी प्रकरणाचा दाखला देत, राजकीय दबावामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप केला. “मस्साजोगचे सरपंच व्हिडिओ प्रकरणात मोरे यांना कराडने मदत केली होती. राजकीय दबावामुळे पोलिसांनी पीडितेची तक्रार न नोंदवता चुकीचा गुन्हा नोंदवला,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, अण्णासाहेब मोरे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. “संभाजी ब्रिगेड आणि देसाई यांनी हे आरोप थांबवले नाहीत, तर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू,” असा इशारा मोरे यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे आरोप निराधार असून ते खोटे आहेत.

संभाजी ब्रिगेडने मात्र आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे आणि मोरे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता दिसत आहे.

Related Articles

Back to top button