ताज्या बातम्या

‘अजितदादांना पक्षातून बाहेर काढण्याचं षडयंत्र’, धनंजय मुंडे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

नवसंकल्प शिबिरात धनंजय मुंडे यांनी अजित पवारांबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याच्या षडयंत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे

त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी अजित पवारांना भाजपसोबत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून दादांना पक्षातून बाजुला करण्यासाठी षडयंत्र सुरू होतं, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात बोलताना मुंडे यांनी हे धक्कादायक खुलासे केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “2019 च्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. मी दादांच्या पाया पडलो, पण त्यांनी मला सांगितलं की, काहीही होणार नाही. सुनील तटकरे याला साक्षीदार आहेत.” मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांना पक्षातून दूर करण्यासाठी सुरू झालेल्या षडयंत्राचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

याशिवाय, मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडल्याचं आणि त्यासाठी काही व्यक्तींनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केल्याचंही सांगितलं. “मला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे, बीड जिल्ह्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे,” असं त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं.

त्याचबरोबर बीडमध्ये सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचं सांगताना, गुन्हेगारांना फाशी दिली जावी, असं ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पदाबाबतही मोठं विधान केलं. ते म्हणाले की, बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री यांना देण्याची विनंती केली होती.

त्यांची मते अशी होती की, उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बीडचा विकास होईल. त्याचबरोबर त्यांनी सध्याच्या परिस्थितीत बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे सोपवण्याची सूचना केली होती.

धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यांमुळे बीडमधील राजकीय वातावरण तापलं असून, त्यांची भूमिका आणि पक्षातील मतभेद चर्चेत आले आहेत.

Related Articles

Back to top button