पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एका आरपीएफ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
एका माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागचे कारण नक्की काय आहे हे अजून समजू शकलेले नाही. पोलिस चौकशीत यासर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.
आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जयपुर-मुंबई रेल्वेत हा गोळीबार झाला. त्या कॉन्स्टेबलने तीन प्रवासी आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये आरपीएफचे एएसआय टीका राम हे सुद्धा होते. ते राजस्थानचे रहिवासी होते.
चेतनने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या चेतनने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती.
चौघांच्या मृत्यूमुळे बोगीची भयानक अवस्था झाली होती. सर्वत्र रक्त पडलेले होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. ते पाहून प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी ही बोगी सील करुन तपास सुरु केला आहे.
सध्या जयपूर-मुंबई पॅसेंजर मुंबई सेंट्रलला नेण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमचे अधिकारी या बोगीची तपासणी करत आहे. बोगीच्या तपासणीनंतर ती कारशेडला नेण्यात येणार आहे. तर चेतनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.