चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम यांचाही मृत्यू झाला आहे.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन नावाच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा आणि एका एएसआयचा मृत्यू झाला आहे.

सध्या चेतनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून नक्की काय झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता त्यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.

चेतनने गोळीबार का केला त्यामागचे कारण पुर्णपणे कळू शकलेले नाही. अधिकारी आणि ज्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह डोंबिवली येथे रेल्वेतून उतरवून घेण्यात आले आहे, असे सुमीत ठाकूर यांनी म्हटले आहे.

गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलने दहिसर येथे चेन पुल केली आणि तो रेल्वेतून खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. तो मानसिक तणावाखाली होता की नाही? किंवा काहीतरी वेगळे कारण होते हे या चौकशीतून समोर येईल, असेही सुमीत ठाकूर यांनी म्हटले आहे.

तसेच सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत तिथे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली जाणार आहे, असे सुमीत ठाकूर यांनी म्हटले आहे.