सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती.
या गोळीबारात तीन प्रवासी आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. तसेच रेल्वेत नक्की काय घडलं याबाबतही पोलिसांनी सांगितले आहे.
पहाटेच्या वेळी चेतन सिंग आणि बी ५ बोगीतील प्रवाशांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चेतन सिंगने आपली रिव्हॉल्वर प्रवाशांच्या डोक्यावर धरली होती. त्यावेळी एएसआय टीकाराम हे तातडीने तिथे आले आणि चेतन सिंगला शांत राहण्यास सांगितले.
टीकाराम चेतनची समजूत काढत होते. पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे संतापलेल्या चेतनने आधी टीकाराम यांना गोळी मारली. त्यानंतर ते तिथेच पडले. तर इतर प्रवाशांनी तिथून पळ काढला. चेतन सिंगने त्यावेळी त्या प्रवाशांचा पाठलाग केला.
चेतन सिंगने दोन प्रवाशांना बी ५ या बोगीमध्ये मारले तर एका व्यक्तीला एस ६ मध्ये मारले. तो बंदुक घेऊनच बोग्यांमध्ये फिरत होता. त्याने इतरांवरही गोळीबार केला. पण सुदैवाने त्यांना काही हाणी झाली नाही. चेतन सिंगने एकूण सहा गोळ्या मारल्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी चेतनला बोरीवली येथील रेल्वे पोलिसांच्या स्टेशनमध्ये नेले असून त्याची चौकशी सुरु आहे. पण तो सतत आपले जबाब बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो आधी गुजरातमध्ये कार्यरत होता. पण त्याची मुंबईला बदली झाली. त्या बदलीमुळे त्याच्या डोक्यात राग होता. त्यामुळे त्याने असे केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.