माझा मुलगा कुठय? मुलाचा जीव घेणाऱ्या आईचा पोलिसांना सवाल, पोलिसही झालेत हैराण

राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याचा मुलाचा जीव घेतला आहे. त्यानंतर तिने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

एका महिलेने आपल्या १४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे. ती एका वेगळ्याच विश्वामध्ये जगत होती. नवनवीन कहाण्या ती रचत होती. याच कहाण्यांमुळे तिने आपला मुलगा पुरंजय पारेखचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

मनिषा पारेख असे त्या महिलेचे नाव आहे. पुरंजयच्या मृत्यूनंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता महिला एका वेगळ्याच जगात जगत असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी पोलिस महिलेच्या खोलीमध्ये शिरले होते. त्यावेळी महिला आपला जीव देण्याचा प्रयत्न करत होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपणच मुलाचा जीव घेतलाय असे तिनेच पोलिसांना फोन करुन सांगितले होते.

५ वर्षांपासून मनिषावर उपचार सुरु होते. ती आजारी होती. पण आपण ठीक असल्याचे सांगत तिनं औषध घेणं बंद केलं होतं. त्यामुळे तिची मानसिकस्थिती आणखी बिघडली होती. ती तिच्या मनामध्ये वेगळ्याच कहाण्या रचत होती.

आपल्या पतीचं दुसऱ्या एका महिलेशी नातं असल्याचा संशय तिला होता. तसेच आपल्या बरोबर आणि मुलाबरोबर काहीतरी चुकीचं होणार अशी भितीही तिला होती, अशी माहिती पोलिसांनी महिलेच्या चौकशीनंर दिली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण मुलाचा जीव घेतला आहे हे तिच्या लक्षातही राहीले नव्हते. पोलिसांनी जेव्हा तिला ताब्यात घेतले तेव्हा ती मुलाच्या प्रकृतीबाबत विचारणा करत होती. तसेच आपला मुलगा कुठे आहे असे ती सतत पोलिसांना विचारत होती.