प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नितीन देसाई यांच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. ते त्यांना फेडायचे होते. पण आर्थिक परिस्थिती खराब होत चालल्यामुळे त्यांना ते फेडता येत नव्हते. त्यांच्यावर दबावही टाकला जात होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
नितीन देसाई यांनी काही व्हॉईस नोट्सही रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी चार व्यवसायिकांची नावे घेतली होती. ते आपल्यावर दबाव टाकत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पोलिस सध्या या सर्व गोष्टींचा तपास करत आहे.
अनेक नेते, कलाकार नितीन देसाईंच्या निधनावर प्रतिक्रिया देत आहे. आता प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत वाईट बातमी असून मी या बातमीमुळे प्रचंड दु:खी झालो आहे, असे महेश मांजरेकरांनी म्हटले आहे.
मराठी सिमेनासाठी नितीन देसाई गर्व होते. कलादिग्दर्शकापेक्षा जास्त ते माझे मित्र होते. मी खुप दुखावलो आहे. काय बोलावं मला कळत नाहीये. माणसाच्या डोक्यात काय सुरु आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला नंतर कळत आपण बोलायला हवं होतं का? असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.
नितीन देसाई यांनी एक दर्जा निर्माण केला होता. त्यांच्या जाण्यामुळे कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. तेव्हा ते खुप शांत झाल्यासारखे वाटत होते, असेही महेश मांजरेकरांनी म्हटले आहे.
तसेच मला शिवाजी राजे भोसले चित्रपटासाठी शुटींग करायचे होते. त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो होतो. ते मराठी माणसाला कधीच आपल्या स्टुडिओचा रेट सांगायचे नाही. नेहमी तुमचं बजेट असेल तेवढं द्या, असे म्हणायचे. नितीन देसाई मदतीसाठी कायम पुढे धावून यायचे, असेही महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.