चक्कर आल्याचं निमीत्त अन् नवऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी गुप्त तपास करताच समोर आलं धक्कादायक सत्य

पुण्यातील दौंडमधील यवतमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला होता. पण पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृत्यू त्याच्या पत्नीच्या मारहाणीमुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

संतोष पवार या ३९ वर्षीय व्यक्तीच्या आकस्मित निधनाची नोंद यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पण पोलिसांना याबाबत संशय आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा गुप्त तपास सुरुच ठेवला होता. अखेर त्यांचा संशय खरा ठरला.

संतोष यांची पत्नी पल्लवी पवार हिने केलेल्या मारहाणीमुळेच संतोष यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. आता या प्रकरणी पोलिसांनी पल्लवीला अटक केली आहे. तिची चौकशी केल्यानंतर तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन महिन्यांपूर्वी संतोष आणि पल्लवी कामासाठी नवागाव येथे राहायला गेले होते. संतोषला दारुचे व्यसन असल्यामुळे त्यांचात रोज वाद होत होता. वारंवार सांगूनही संतोष दारु पिणे बंद करत नव्हता. २२ जुलैलाही संतोष दारु पिऊन घरी आला होता. त्यावेळी पल्लवीने त्याला काठीने मारहाण केली.

पल्लवी संतोषला हातावर आणि पायावर मारत असतानाच त्याच्या डोक्यालाही एक फटका बसला. पुढे दोन तीन दिवस संतोषला चक्कर येणे, उलट्या होणे अशा गोष्टी होऊ लागल्या. ३० जूलैलाही त्याला चक्कर आली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आकस्मित मृत्यू झाल्याचे सर्वांना वाटत होते. पोलिस ठाण्यातही तशीच नोंद झाली होती. पण पोलिस ठाण्याचे केशव बावळे यांना संशय आला. त्यांनी पोलिस निरीक्षक हेमंत शेंगडे यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. तपास करत असताना पल्लवीने संतोषला मारहाण केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

तसेच पोलिसांनी शवविच्छेदनाचाही अहवाल तपासला. त्यामध्ये डोक्याला मार लागल्यामुळे संतोषचा मृत्यू झाला होता, असे स्पष्ट करण्यात आले होते. पोलिसांचा संशय खरा ठरल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पल्लवीला अटक केली आहे.