जीवन संपवण्यापूर्वी नितीन देसाईंना काय वाटत होतं? ‘त्या’ ११ व्हॉईस नोट्समधून झाले मोठे खुलासे

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

२५० कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्टुडिओमध्ये पोलिसांना एक व्हॉईस रेकॉर्डरही सापडला आहे. त्यामध्ये त्यांनी ११ व्हॉईस नोट्स रेकॉर्ड करुन ठेवलेल्या होत्या, असे समोर आले आहे.

त्या ११ व्हाईस नोट्सपैकी एकामध्ये लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार, असे म्हटले आहे. नितीन देसाई हे भव्यदिव्य सेट डिझाईन करण्यासाठी ओळखले जायचे. गेल्या काही वर्षांपासून ते लालबागच्या राज्याच्या सजावटीचे कामही बघत होते.

अशात काही दिवसांवर गणेशोत्सव राहिला होता. पण त्याच्या आधीच नितीन देसाई यांनी जीवन संपवल्यामुळे त्यांचे यावर्षीचे सजावटीचे स्वप्न अपुर्णच राहिलेले आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिन्यात गणपती होते आणि त्यांनी लालबागच्या राज्याचे सजावटीचे काम सुरुही केले होते. ९० व्या वर्षीच्या मंडप पुजनाचा श्रीगणेशा झाला, अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती.

दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी नितीन देसाई यांनी ११ व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्या त्यांनी कुटुंबातील सदस्य, मित्र आणि आपल्या वकीलांना पाठवल्या होत्या. ज्या कंपनीकडून आपण कर्ज घेतले होते. त्यांनी आपली फसवणूक केली, त्यांनी आपल्यावर दबाव आणला असे त्यामध्ये म्हटलेले होते.

तसेच स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपनीला देऊ नये. तो सरकारने घ्यावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. नितीन देसाई यांनी त्या व्हाईस नोट्स सहायक योगेश ठाकूर यांना पाठवल्या होत्या. आता त्यांनी त्या वकीलांना पाठवल्या आहे. पोलिस व्हॉईस नोट्समध्ये आलेल्या नावांचीही चौकशी करणार आहे.