बुधवारी सकाळी नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते एक प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. पण वयाच्या ५८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
नितीन देसाई हे मंगळवारी रात्री आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे त्यांनी जीवन संपवले आहे. नितीन देसाई यांनी जीवन संपवण्याआधी काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. तसेच त्यांनी एक नोटही लिहीली होती, अशी माहिती समोर आली आहे.
त्या नोटमध्ये त्यांनी आपले अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओच्या जागेवरच करण्यात यावा असे लिहीलेले होते. त्यावरुन त्यांचा आपल्या स्टुडिओमध्ये किती जीव होता, हे लक्षात येते. त्यांनी हा स्टुडिओ ५२ एकराच्या जमिनीत २००६ साली बनवला होता.
तसेच नितीन देसाई यांनी जीवन संपवण्यापूर्वी एक धनुष्यबाण बनवला होता. पण त्यांनी तो का बनवला? त्याचा अर्थ काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन देसाई यांना आपला स्टुडिओ जप्त होईल अशी भिती वाटत होती, अशीही सध्या चर्चा आहे.
नितीन देसाई हे गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करत होते. ते कर्जबाजारी झाले होते. त्यांनी २०१६ मध्ये एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते कर्ज वाढून २४९ कोटी रुपयांचं बनलं होतं. त्यामुळे त्यांचा तणाव वाढत होता.
कोर्टातही याची सुनावणी पार पडली होती. कोर्टाने मालमत्ता जप्त करून कर्ज वसूली करा, अशा सुचना दिल्या होत्या. त्यामुळे आपला स्टुडिओ जप्त केला जाईल अशी भिती त्यांना वाटत होती. त्यामुळे ते बघण्याआधीच त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, रात्री नितीन देसाई यांनी स्टुडिओच्या मॅनेजरकडून व्हॉईस रेकॉर्डर घेतला होता. त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये त्यांनी काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या आहेत. त्यामध्ये चार व्यवसायिकांची नावे त्यांनी सांगितली आहे. सध्या तो व्हॉईस रेकॉर्डर पोलिसांच्या ताब्यात आहे.