देसाईंनी मृत्यूआधी काढलेल्या ‘त्या’ धनुष्यबाणाचा अर्थ काय? व्हाईस क्लिप्समधून धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते खुप तणावात होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

नितीन देसाई यांनी स्टुडिओसाठी कर्ज घेतले होते. पण काम मिळत नसल्यामुळे त्यांचं टेंशन वाढत होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे कर्जाची रक्कम परत करणंही त्यांना कठीण जात होतं. त्यामुळे या गोष्टींना कंटाळून त्यांनी असा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी रात्री ते एनडी स्टुडिओमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी मॅनेजरकडून एक व्हॉईस रेकॉर्डर घेतले. त्यामध्ये त्यांनी ११ व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या. तसेच त्यांनी दोरीने एक धनुष्यबाणही तयार केला होता. त्यानंतर त्यांनी जीवन संपवले होते.

नितीन देसाईंनी तो धनुष्यबाण का काढला? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याचे वेगवेगळे अर्थही लावण्यात येत होते. पण आता त्याचा अर्थ समोर आला आहे. त्यांनी ज्या व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्येच त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे.

एनडी स्टुडिओचं शिवधनुष्य उचललं होतं. पण आता ते खाली ठेवण्याची वेळ आली आहे, असे नितीन देसाई यांनी व्हॉईस नोट्समध्ये म्हटले आहे. तसेच मी संकटातून बाहेर पडण्याचा खुप प्रयत्न केला, पण पडू शकलो नाही, असेही नितीन देसाईंनी म्हटले होते.

दरम्यान, नितीन देसाई यांनी एका तरुणाला सांगितलं होतं की तु २ ऑगस्टला स्टुडिओमध्ये ये. तिथे तुला रेकॉर्डर मिळेल तु ते ऐक. त्यानुसार तो तरुण सकाळी साडेआठला स्टुडिओमध्ये गेला होता. तिथे त्याने नितीन देसाईंना त्या अवस्थेत बघितले. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना याबाबत सांगितले.